Pune

पुण्यात मुळा कालवा फुटला; दांडेकर पुल पाण्याखाली

By PCB Author

September 27, 2018

पुणे, दि. २७ (पीसीबी) – पुण्यातील जनता वसाहतजवळून जाणारा मुळा कालवा आज (गुरूवारी) दुपारी फुटला आहे. यामुळे दांडेकर पुलावर पाणी आले आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे.

जनता वसाहतीजवळ मुळा कालव्याची भिंत कोसळली. यामुळे कालव्यातील पाणी परिसरात शिरले आणि अवघ्या काही वेळात परिसर जलमय झाला. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दांडेकर पुलावर पाणी आले असून यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. कालव्यालगत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू झाले आहे. खडकवासला धरणातून कालव्यात होणारा विसर्ग थांबवण्यात आला असून नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून कालव्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.