मुख्यमंत्री, तुम्ही तरी आम्हाला वाचवा; पुण्यात फलक झळकावणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक

0
592

पुणे, दि.२३ (पीसीबी) – सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कार्यक्रमात  मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना फलक झळकावणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘मुख्यमंत्री, महोदय आता तुम्ही तरी आम्हाला वाचवा’, अशा आशयाचा पोस्टर दाखवित मुख्यमंत्री साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी यावेळी  केली.

रासेयो कक्ष महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आज (सोमवार) आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी आणि अभियान महासंकल्प कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने फलक झळकावले. पोलिसांनी हा गोंधळ पाहताच त्या तरुणाला ताब्यात घेतले.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सोमनाथ लोहार म्हणाला की, ‘विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मागील काही महिन्यात आंदोलन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. ते मागे घेण्याबाबत अनेकवेळा प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. मात्र,  कोणत्याही प्रकारची दखल  घेतली नाही. त्यामुळे आज हे  पाऊल उचलावे लागले.  पाच मिनिटे तरी मुख्यमंत्र्यांशी बोलू द्यावे, असे त्यांनी सांगितले.