Pune

पुण्यात भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी

By PCB Author

December 04, 2020

पुणे : यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे. पुणे पदवीधर मतदार संघात पहिल्याच पसंती क्रमांकाची तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते घेऊन , महा विकास आघाडीचे अरुण गणपती लाड विजयी झाले आहेत. त्यांनी 48 हजार 824 मतांनी बीजेपीचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली..

पदवीधर करिता २ लाख 47 हजार 50 इतके मतदान झले होते. एकूण मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी 57. 96 टक्के इतकी होती. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. मतमोजणीत यापैकी 2 लाख 28 हजार 272 हे वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास 1 लाख 14 हजार 137 हा विजयी कोटा ठरविण्यात आला. एकूण 112 टेबल वर ही मतमोजणी सुरू होती. अपेक्षेप्रमाणे ही मतमोजणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत चालेल असे बोलले जात होते. मात्र पहिल्याच पसंती क्रमांकात लाड यांनी तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळवून आपला विजय निश्चित केला. पदवीधर निवडणूक च्या निकषानुसार वैध मतांच्या 50 टक्के अधिक 1 अशी मते लाड यांनी मिळविल्याने शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास लाड यांचा विजय निश्चित झाला आहे. सकाळी 10 वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकारी यांच्याकडून त्यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाईल. तर शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर यांची विजयाकडे घोड़ दौड सुरू; अधिकृत निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.