पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे चार जणांना उलट्या; ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

0
868

पुणे, दि. २६ (पीसीबी) – घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर थोड्या वेळाने घरात येऊन झोपलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. तर  ९ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना  सिंहगड रोड परिसरात घडली आहे.  सोमवारी (दि.२४) मध्यरात्री ही घटना घडली .  

सार्थक डोंगरे असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. संदीप डोंगरे हे पत्नी आणि दोन मुलांसह सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात राहतात. संदीप डोंगरे हे स्वतः पेस्ट कंट्रोलची कामे करतात. ढेकून झाल्यामुळे त्यांनी सोमवारी घरात पेस्ट कंट्रोल केले होते.

यानंतर संदीप डोंगरे पत्नी आणि मुलांसह बाहेर पडले होते. त्यानंतर रात्री घरी येऊन झोपी गेले. मध्यरात्री या सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सिंहगड रोड परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान, सार्थक डोंगरे या मुलाची प्रकृती अधिक खालावल्याने डॉक्टरांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तर संदीप डोंगरे, त्यांच्या पत्नी आणि साहील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.