पुण्यात पावसाचा धुमाकूळ, चंदननगर पोलिस ठाणे पाण्यात

0
283

पुणे, दि. 15 (पीसीबी): शहरातील मुख्य भागात पाणी आल्याने रस्ते बंद झाले आहेत. शहर आणि परिसरात दुपारनंतर हळू हळू पावसाचा जोर वाढला. रात्री आठ ते नऊच्या सुमारास पावसाने खूप जोर धरला होता. परिणामी शहरातील सखल भागांत पाणी साचले असून, अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. तर रात्री सिंहगड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान रात्री १२ वाजता पाण्याचा जोर कमी झाला. शहरातील विविध भागात पाणी शिरल्याचे सुमारे ९० फोन अग्निशमन दलाच्या कार्यालयात आले. शहरातील बहुसंख्य रस्ते चाैकांतून पाणी तुंबल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
यामुळे कामानिमीत्त बाहेर पडलेल्यांची मोठी तारांबळ उडाली. नगर रोडला चंदननगर पोलिस ठाणे अक्षरशः पाण्यात तरंगत होते. चौकात, रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
शहरातील टांगेवाला कॉलनी, गुरुराज सोसायटी, ट्रेझर पार्कसह आंबील ओढ्यालगतच्या वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे. टांगेवाला कॉलनीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना विद्या विकास शाळेत हलविण्यात आले आहे. तर ट्रेझर पार्क सोसायटीतील नागरिकांची तळ पार्किंगमध्ये पार्क करण्यात आलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू आहे.
अरण्येश्वर मंदिर, गजानन महाराज मठ परिसर येथून कमरे इतके पाणी वाहत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. गजानन महाराज मठा मागील साती आसरा शाळेत देखील पाणी शिरले आहे. येथील १५ ते २० जनावरे स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली आहेत. बल्लाळ सोसायटीत पाणी शिरले आहे. तळजाई परिसरातील रस्त्यावर प्रचंड पाणी वाहत आहे. सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर या भागात रस्त्यावरून जोरदार पाणी वाहत आहे. लक्ष्मीनगर शाहू वसाहत व मार्केटयार्ड येथील आनंदनगर येथील घरामध्ये पाणी शिरले आहे नागरिकांची झोप उडाली आहे.
महर्षीनगर भागातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ विजेचा लपंडाव सुरू होता. मुसळधार पावसाच्या पाण्याचा फटका अनेक कुटुंबांना बसला, गुलटेकडी परिसरातील इंदिरानगर, डायस प्लॉट, खिलारे वसाहत, मार्केटयार्ड भागातील आंबेडकरनगरमधील अनेक घरांत पाणी शिरले. रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असताना वाहने वाहून गेल्याचे प्रकार घडले.
औंध, बाणेर रस्ता, सकाळ नगर, बोपोडी, पंचवटी, पाषाण, सूसरस्ता, सूस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पाषाण सूसरस्ता येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. बाणेर बालेवाडी परिसरात गेल्या दोन तासांत मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. लक्ष्मीनगर येथील शाहू वसाहतीमध्ये अनेक घरांत 3 ते 4 फूट पाणी शिरले. घोरपडीमध्ये अर्धा तासापासून वीज गेली असून, रस्त्यावर व खोलगट भागात पाणी साचले आहे.
सहकारनगर संतनगर अण्णा भाऊ साठे नगर येथील वस्ती मध्ये पाणी शिरले असून नागरीक घरातील पाणी काढत आहे. लक्ष्मी नगर शिवदर्शन, शाहू वसाहत, शंकर महाराज वसाहत, आनंद नगर,संभाजी नगर शंकर महाराज वसाहत या भागात घरांमध्ये पाणी शिरले आहे. लेकटाऊन हौसिंग सोसायटीचे बेसमेंट मध्ये पाणी शिरत आहे. सागर कॉलनी, लालबहादुर शास्त्री कॉलनी येथील घरांमध्ये पाणी शिरले.
शहरासह उपनगरात मुसळधार पाऊस पडत असून, रस्ते जलमय झाले आहेत. मागील वर्षी आंबिल ओढ्याला आलेल्या पुराची आठवण या पावसामुळे नागरिकांना येत असून, ओढ्याशेजारील वस्ती, सोसाट्याचा भागातील नागरिक भयभीत झाले आहेत, सातारा रस्त्यावरील आंबिल ओढ्या शेजारील गुरुराज सोसायटीमध्ये नागरिक रस्त्यावर आले असून, पुन्हा मागील वर्षी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही ना या काळजीत आहेत. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले व झाडांची पडझड झाल्याचे कॉल अग्निशमन दलाला आहे आहेत.

पुणे-सोलापूर महामार्ग काहीकाळ बंद –
परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यात बुधवारी (दि. 14) दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक रस्त्यावरून पाणी वाहत होते. खबरदारीचा भाग म्हणून पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद केली होती. पावसाचा जोर ओसरताच पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली.
भिगवण, लोणी देवकर, पळसदेव, डाळज नंबर 1, 2, 3, भादलवाडी आणि इंदापूर शहरात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे महामार्गावरील भादलवाडी येथील भीमा नदीवरील पुलास पाणी लागल्याने व भिगवण परिसरात काही दुचाकी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने पोलिस प्रशासनाने काही काळ हा रस्ता बंद केला होता. दरम्यान, भादलवाडी येथील पुलाजवळ भिगवण पोलिस प्रशासनाने पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत केली आहे.