पुण्यात पावणेतीन लाखांची रोकड जप्त; निवडणूक स्थिर स्थावर पथकाची कारवाई

0
676

पुणे, दि. १६ (पीसीबी) – निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर स्थावर पथकाने पोलिसांच्या मदतीने सोमवारी रात्री उशीरा गुलटेकडी येथील सॅलेसबरी पार्कजवळील एका कारमधून पावणेतीन लाखांची रोकड जप्त केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा स्थिर स्थावर पथक क्र. १ चे अधिकारी सचिन प्रकाश पवार, आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका तथा इलेक्शन मॅजिस्ट्रेट हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गुलटेकडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी सॅलेसबरी पार्क येथील पुनावाला गार्डनजवळ वाहन तपासणी करत असताना एका कारमध्ये पावणेतीन लाखांची रोकड आढळून आली.

यासंदर्भात पवार यांनी भरारी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत देंडगे यांना या पैशांबद्दल माहिती दिली. उपनिरीक्षक देंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही रोकड महेंद्र मांगीलाल कावेडीया, (वय ५४, रा. २१४२ न्यु मोदी खाना, कॅम्प) यांची असल्याचे निष्पन्न झाले. लोकसभा निवडणुक अचार संहितेच्या कार्यवाही नुसार ही रोख रक्कम स्थिर स्थावर पथकाचे अधिकारी पवार यांनी जप्ती पंचनामा करून जप्त केली. ही रोकड स्वारगेट पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आली आहे.