पुण्यात पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून

0
480

पुणे, दि. १४ (पीसीबी) – पत्नीला शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरुन तिन जणांनी मिळून एका तरुणाच्या डोक्या लोखंडी रॉडने वार करुन त्यांचा खून केला. ही घटना बुधवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास पुण्यातील पद्मावती येथील वीर लहुजी सोसायटीत घडली.

मोहन शिवाजी गायकवाड (वय २८, रा. वीर लहुजी सोसायटी, पद्मावती) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राकेश तुळशीराम पाटोळे, तुळशीराम पाटोळे आणि गणेश वैराट (सर्व रा. वीर लहुजी सोसायटी, पद्मावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन गायकवाड आणि तीनही आरोपी हे पुण्यातील पद्मावती येथील वीर लहुजी सोसायटीत शेजारी शेजारी रहातात. ते सर्व जण दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरला गेले होते. तेथे त्यांच्यात काही वाद झाला होता. तेथून सर्व जण बुधवारी सकाळी परत आले. त्यानंतर सायंकाळी मोहन गायकवाड हा सोसायटीत उभा असताना राकेश, त्याचे वडिल तुळशीराम पाटोळे आणि गणेश वैराट तेथे आले. तेव्हा राकेश पाटोळे याने माझ्या पत्नीला तु काय म्हणाला, तिला शिवीगाळ का करतो, असे विचारले. यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा तिघांनी मिळून मोहनला बेदम मारहाण केली. राकेशने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केला. या घटनेत मोहन गंभीर जखमी झाला आणि त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तुळशीराम पाटोळे याला अटक केली असून गणेश आणि राकेश फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.