Pune

पुण्यात दोन दिवसात ४८८ मद्‌यपी वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई; न्यायालयात खटले दाखल

By PCB Author

August 13, 2018

पुणे, दि. १३ (पीसीबी) – अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तेसच वाहतूकीस शिस्त लागण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी तब्बल ४८८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. ही कारवाई ११ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या दोन दिवसांदरम्यान शहरपरिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दिलेल्या सुचनांनुसार शनिवारी ११ ऑगस्ट ते रविवारी १२ ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी पुणे शहर परिसरातील विविध ठिकाणी दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या तब्बल ४८८ जणांवर कारवाई केली. पोलिसांनी या मद्यपी वाहन चालकांविरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ अनुसार कारवाई करुन त्यांचे विरुध्द मोटार वाहन कोर्ट, पुणे यांच्या न्यायालयात खटले दाखल केले आहेत.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी शहर परिसरातील नागरिकांना मद्यपान करुन वाहन चालवण्याने अपघात होतात त्यामुळे मद्यपान करुन वाहन चालू नका, असे आवाहन केले आहे.