पुण्यात टोळक्यांच्या भांडणात निरपराध वृध्दाचा गोळी लागून मृत्यू

0
442

फुरसुंगी, दि. १४ (पीसीबी) – दोन टोळक्यांच्या गटात सुरु असलेल्या भांडणादरम्यान एकाने दुसऱ्यावर गोळीबार केला. ही गोळी रस्त्याने पायी चाललेल्या एका निरपराध वृध्दाला लागली आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१३) रात्री साडेसातच्या सुमारास हडपसर फुरसुंगी येथे घडली.

पंचय्या सिद्धय्या स्वामी (वय ५५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास फुरसुंगी येथे तरुणांच्या दोन गटात भांडण सुरु होते. यादरम्यान, एकाने दुसऱ्या टोळीच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली. ही गोळी रस्त्यावरुन जाणाऱ्या स्वामी यांना लागली. त्यांना तातडीने नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंचय्या सिद्धय्या स्वामी हे एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. हडपसर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.