पुण्यात जगातील सर्वात मोठा संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थनागृहाचा घुमट

625

पुणे, दि. २१ (पीसीबी) –  जगातील सर्वात मोठ्या व्यासाच्या घुमटाची निर्मिती पुण्यातील एम आय टी शिक्षण संस्थेकडून करण्यात आली आहे. या संस्थेने पुण्याजवळील लोनी काळभोरमधे उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थनागृहाचा घुमट, हा तब्बल १६० फूट व्यासांचा आहे, तर या प्रार्थनागृहाची उंची २६३ फूट आहे.

आतापर्यंत ख्रिस्ती धर्मीयांचे सर्वात मोठे तीर्थस्थळ असलेल्या व्हॅटिकनमधील चर्चच्या घुमटाचा व्यास हा सर्वाधिक म्हणजे १३६ फुटांचा होता. मात्र विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी उभारलेल्या लोनी काळभोरमधील सभागृहाचा घुमट आता जगातील सर्वात मोठा घुमट ठरणार आहे.

सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी या घुमटाची निर्मिती करण्यात आल्याचे एम आय टी ने म्हटले. कारण या प्रार्थनागृहात जगभरातील तत्त्ववेत्ते आणि महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. येत्या दोन ऑक्टोबरला म्हणजे गांधी जयंतीच्या निमित्ताने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हस्ते या प्रार्थनागृहाचे उद्घाटन केले जाणार आहे.