पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नी आणि चिमुकल्या मुलीचा केला निर्घृण खून

0
1803

पुणे, दि. २२ (पीसीबी) – चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपली पत्नी आणि अडीच वर्षांच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून निर्घृण खून केला. त्यानंतर स्वता:वर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्क्दायक घटना आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास पुण्यातील ताडीवाला रोड येथे घडली.

तबस्सुम शेख आणि मुलगी अलिना शेख असे खून झालेल्या दोघी मायलेकीची नावे आहेत. तर आयाज शेख असे जखमी पतीचे नाव आहे. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयाज शेख हा एका खाद्यपदार्थाच्या दुकानात कामाला आहे. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून त्यांची नेहमी भांडणे होत होती. त्यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही केला होता. त्याची सुनावणी पूर्ण झाली होती. येत्या महिन्याभरात त्यावर निकालही लागणार होता. तबस्सुम या ताडीवाला रोडवरील बुद्ध विहाराजवळील वडिलांच्या घरी मुलीसह रहात होती. मंगळवारी पहाटे आयाज तेथे आला. त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात आयाज शेख याने पत्नी तबस्सुम आणि मुलगी अलिना या दोघींवर चाकूने सपासप वार करुन त्यांचा खून केला. त्यानंतर चाकूने स्वत:च्या पोटावरही वार करुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आयाजने पत्नीची हत्या केल्यानंतर घराच्या भिंतीवर रक्ताने ‘मै किसको नहीं छोडूंगा, निकल जाओ मेरे घरसे’ असा मजूकरही लिहिला आहे. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आयाज याला ससुन रुग्णालयात दाखल केले असून हत्येसाठी वापलेला चाकू जप्त केला आहे.