पुण्यात करोनाचे आणखी दोन बळीची नोंद शहरातील मृतांची संख्या १० वर

0
341

 

पुणे, दि.८ (पीसीबी) – आज पहाटे पुण्यात करोनाचे आणखी दोन बळीची नोंद झाली. शहरातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० वर पोहचली आहे. शहरातील नायडू व ससून रुग्णालयात हे दोन मृत्यू झाले आहेत.

सर्वप्रथम आज सकाळी पुण्यातील रविवार पेठ येथील एका ४४ वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे करोनासह अन्य आजारांमुळे मृत्यू झाला. या व्यक्तीस अनियंत्रित मधुमेहामुळे ४ एप्रिल रोजी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. त्यांची करोना टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली होती. त्यात मुत्रपिंड निकामी होऊन त्यांचा पहाटे मृत्यू झाला. असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली होती .

त्यानंतर शहरातील ससून रुग्णालयात आणखी एका करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली.

सरसकट बंदी असतानाही आदेशाचे पालन होत नसल्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढत असून दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. महर्षिनगर, कोंढव्यासह या लगतच्या पेठांमधील भागात सोमवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग सील करण्यात आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही भागात संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या बाबतची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, मात्र संबंधित भागातील रुग्णालये, औषधे विक्री दुकाने, दूध विक्री, किराणा माल, भाजीपाला दुकाने अशा अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. परंतु, या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडणे, आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात जाणे आणि वाहतुकीवर संपूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत.