पुण्यात करोनाचा आणखी एकाचा बळी शहरातील मृतांची संख्या ९ वर

0
362

 

पुणे, दि.८ (पीसीबी) – आज पहाटे पुण्यात करोनाच्या आणखी एका बळीची नोंद झाली. या मृत्यूमुळे शहरातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९ वर पोहचली आहे.

पुण्यातील रविवार पेठ येथील एका ४४ वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे करोनासह अन्य आजारांमुळे मृत्यू झाला. या व्यक्तीस अनियंत्रित मधुमेहामुळे ४ एप्रिल रोजी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. त्यांची करोना टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली होती. त्यात मुत्रपिंड निकामी होऊन त्यांचा पहाटे मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

सरसकट बंदी असतानाही आदेशाचे पालन होत नसल्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढत असून दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. महर्षिनगर, कोंढव्यासह या लगतच्या पेठांमधील भागात सोमवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग सील करण्यात आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही भागात संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या बाबतची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, मात्र संबंधित भागातील रुग्णालये, औषधे विक्री दुकाने, दूध विक्री, किराणा माल, भाजीपाला दुकाने अशा अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. परंतु, या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडणे, आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात जाणे आणि वाहतुकीवर संपूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत.

संबंधित भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. टाळेबंदी केलेल्या भागात करोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे.