Notifications

पुण्यात ऑडिशनच्या नावाखाली मुलीचा लैंगिक छळ; अभिनेता मंदार कुलकर्णीला अटक

By PCB Author

August 27, 2019

पुणे, दि. २७ (पीसीबी) – नाटकाच्या ऑडिशनसाठीच्या फोटोशूटदरम्यान अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील प्रभात रोड येथे घडली असून पिडित मुलीच्या तक्रारीनंतर मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता मंदार कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे.

बळजबरीने अर्धनग्नावस्थेत फोटो काढल्याचा आरोप पीडित मुलीने मंदारवर केला आहे. २३ ऑगस्ट रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती. संबंधित मुलगी विद्यार्थिनी असून अभिनयात रस असल्याने तिने नाट्यशिबीरात भाग घेतला होता. जानेवारी महिन्यात शनिवार पेठ येथील वर्कशॉपदरम्यान तिची मंदारशी भेट झाली. एका नाटकाच्या ऑडिशनसाठी मंदारने तिला काही फोटोशूट करण्यास सांगितले. या फोटोशूटसाठी त्याने प्रभात रोडवरील बसंत बहार अपार्टमेंटमध्ये येण्यास सांगितले.

फोटोशूटसाठी गेली असता मंदारने तिला पाच ड्रेस परिधान करण्यात दिले होते. त्यापैकी तीन ड्रेसवरील फोटो काढून झाल्यानंतर मंदारने तिला बिकिनी घालण्यास सांगितले. मंदारची मागणी ऐकून ती मुलगी गोंधळली आणि बिकिनीत फोटोशूट करण्यात नकार दिला. या मुलीने विरोध करूनदेखील मंदारने बिकिनीमध्ये फोटोशूट करून घेतले. हे फोटोशूट केल्यानंतर याविषयी घरात सांगू नकोस असेदेखील तिला धमकावण्यात आले होते. यानंतर मुलीनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी मंदारला अटक केली.