Pune

पुण्यातून शरद पवार लोकसभा लढवणार ?

By PCB Author

April 14, 2018

राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारजेतील जाहीर सभेत पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी लोकसभा लढवणार असल्याचा दावा केला होता. या दाव्याला पुष्टी देणारे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी कोणतीही सार्वत्रिक निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  मात्र, विरोधकांनी पंतप्रधानपदासाठी जर पवारांना पाठिंबा दिला. तर ते निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसपेक्षा पुण्यात राष्ट्रवादीचा जनाधार जास्त आहे. त्यातच पवार पुण्यातून लढले तर सहानुभूतीचे वातावरण तयार होऊ शकते. तसेच   राष्ट्रवादीला ताकद मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, पुणे शहरातील लोकसभेची जागा काँग्रेसकडे असून ती आतापर्यंत कधीही राष्ट्रवादीने लढविली नाही. २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी पुण्याचे खासदार होते. मात्र, २०१४ साली मोदी लाटेत भाजपने ही जागा खेचून घेतली. मात्र, आताच्या परिस्थितीत पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात काँग्रेसचे अस्तित्व शोधावे लागेल, अशी परिस्थिती आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने पवार निवडणूक लढवण्यास उत्सुक असतील.