Pune

पुण्यातून लोकसभा लढवण्याचा कोणताही विचार नाही – शरद पवार

By PCB Author

July 06, 2018

पुणे, दि. ६ (पीसीबी) – पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा माझा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करून पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावले आहे. लोकसभा लढवण्यावरून   काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेले दावे-प्रतिदावे यांना पूर्णविराम मिळाला आहे.  

एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी पुण्यातून लोकसभा लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार असल्याचे सांगून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दावा केला होता. त्यानंतर या जागेसाठी शरद पवारच सक्षम उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच पुण्याचे भाजप खासदार अनिल शिरोळे यांनीही पवार यांच्या नावाची दिल्लीत चर्चा असल्याचे जाहीरपणे सांगून या चर्चांना पुष्टी दिली होती. मात्र, शरद पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर  याबाबतच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, मी आतापर्यंत १४ निवडणुका लढलो आहे. त्यामुळे मला सुरक्षित मतदारसंघ शोधायचीही गरज वाटत नाही. काही अराजकीय मंडळी, उद्योगपतींनी मला पुण्यातून निवडणूक लवढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे या चर्चांना सुरूवात झाली होती. माझी कन्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. या मतदारसंघात पुणे शहराच्या काही भागाचा समावेश होत असल्याने मला येथून निवडणूक लढविण्याची गरज वाटत नाही, असे पवार यांनी सांगितले.