पुण्यातून काँग्रेसकडून प्रवीण गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी ?

687

पुणे, दि. १६ (पीसीबी) – पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे असून अद्याप या मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, अनपेक्षितपणे काँग्रेसकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांचे नाव पुढे आले आहे.  तर सोशल मीडियावर गायकवाड यांचा  भावी खासदार म्हणून पोस्ट पडू लागल्या आहेत.

सामाजिक  चळवळ,  मराठा आरक्षण लढ्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. बहुजन समाजातील सर्वसमावेशक चेहरा,  अभ्यासू  परखड  नेता अशी प्रविण गायकवाड यांची ओळख आहे.  सामाजिक संघटनेतून राज्  पातळीवर त्यांनी चांगली प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे  काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असे बोलले जात आहे. मात्र, प्रविण गायकवाड यांनी  यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, प्रविण गायकवाड हे व्यावसायाने  बांधकाम व्यावसायिक  आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांचे विश्वासू निकटवर्तीय  मानले जातात. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीकडूनही मोठा पाठिंबा मिळू शकतो. अशीही सोशल मीडियातून चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता गायकवाड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळते का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.