पुण्यातील मुठा कालवा तिथे अवैधपणे राहणाऱ्या लोकांमुळेच फुटला!  

0
660

पुणे, दि. १३ (पीसीबी) – पुण्यातील मुठा कालवा तिथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांमुळेच फुटला, असा दावा कृष्णाखोरे विकास महामंडळाने उच्च न्यायालयात काल (शुक्रवारी) केला. याचसोबत वस्ती उभी राहिल्यामुळे वेळोवेळी तिथे जाऊन पाहणी करण्यात अडचणी येत असल्याचेही सांगितले. तसेच, कालव्याची पूर्ण दुरुस्ती होण्यासाठी कालवा आता पूर्णपणे बंद ठेवणे गरजेचे असल्याचेही पाटबंधारे विभागाकडून सांगितले आहे.

पर्वती भागात २७ सप्टेंबर २०१८ रोजी मुठा कालव्याची भिंत कोसळली. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचे चित्र निर्माण झाले होते. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचले. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर आले. पाणी खूप मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती.

दांडेकर पूल परिसरात बैठी घरे आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरले होते. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरले. या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा झाले. त्यामुळे नेमके काय झाले आहे हे लोकांना कळलेच नाही.