पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह आढळला; अपहरणानंतर हत्या झाल्याचा संशय

0
2134

पुणे, दि. १२ (पीसीबी) – पुण्यातील शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान असलेल्या दरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ते गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबियांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात केली होती. आता मृतदेह आढळल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शिरसाट यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

विनायक शिरसाट (वय ३२) हे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांचे बंधू किशोर शिरसाट यांनी भारती विद्यापीठा पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रारी केली होती. त्यांतर पोलिस विनायक शिरसाट यांचा शोध घेत होते. त्यांच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हे मुठा गावाच्या हद्दीत मिळून आले. त्यावरून पोलिसांनी या परिसरात दोन दिवस शोध घेतला. अखेर मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान असलेल्या एका दरीत विनायक शिरसाट यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला.

मोबाईल आणि कपड्यांवरून विनायक शिरसाट यांच्या मृतदेहाची पोलिसांना ओळख पटली. त्यांचा मृतदेह दरीतून वर काढला आहे. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. विनायक शिरसाट यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. विनायक शिरसाट यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवला होता. ते एका राजकीय पक्षांशी देखील संबंधित होते. माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी वडगाव धायरी आणि परिसरातील अनधिकृत बांधकामे समोर आणली होती.