पुण्यातील ब्लड बँकेने रुग्णाला एक्स्पायरी डेट उलटून गेलेले रक्त दिल्याने खळबळ

0
564

पुणे, दि. १९ (पीसीबी) –   मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेने एका रुग्णालयाला एक्स्पायरी डेट उलटून गेलेले रक्त दिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली.

याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीच कारवाई ब्लड बँकेवर झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीच्या योगेश लासुरे यांची पत्नी दिपाली लासुरे यांना स्तनांचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्त देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर योगेश लासुरे हे मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेमध्ये पोहचले आणि त्यांनी पैसे मोजून रक्ताची पिशवी खरेदी केली. ती घेऊन ते पुन्हा हॉस्पिटलला आले. योगेश लासुरे यांनी ओम ब्लड बँकेतून आणलेल्या रक्ताच्या पिशवीवरील एक्स्पायरी डेट पाहिल आणि ते भडकलेच. कारण रक्ताच्या पिशवीवर १० ऑक्टोबर २०१८ ही एक्सपायरी डेट होती. आज १९ ऑक्टोबर २०१८ ही तारीख आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हे रक्त योगेश लासुरे यांच्या पत्नीला देण्यास नकार दिला.

दरम्यान, योगेश लासुरे यांनी पुन्हा ओम ब्लड बँकेशी संपर्क साधला असता, चुकीने या रक्ताच्या पिशवीवर पुढील महिन्याऐवजी या महिन्यातील १० तारीख एक्स्पायरी डेट म्हणून टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर योगेश लासुरे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे याची तक्रार केली. मात्र या विभागाने तक्रार दाखल करुनही कोणतीच कारवाई केली नाही. तर ओम ब्लड बँकेकडून क्लेरिकल मिस्टेकमुळे हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत आहे.