पुण्यातील बड्या बिल्डरांकडून महिला उद्योजिकेला मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन

0
1503

पुणे, दि. १७ (पीसीबी) – महिला उद्योजिका काकोली मंडल यांना मारहाण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कुमार डेव्हलपर्सचे मालक ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे मालक अतुल चोरडिया, व्हीटीपी ग्रुपचे मालक संतोष जैन, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चा व समविचारी सामाजिक संघटनांनी सोमवारी (दि. १७) पुण्यातील पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी आपली पावणे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा महिला उद्योजिका काकोली मंडल यांनी केला आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या लोणीकंद पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही या संघटनांच्या वतीने करण्यात आली.

कुमार डेव्हलपर्सच्या वतीने मांजरी खुर्द येथे कुलनेशन या नावाने गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम महिला उद्योजिका काकोली मंडल यांच्या ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्स यांना देण्यात आले होते. परंतु, केलेल्या कामाचे पैसे अदा करण्यासाठी कुमार डेव्हलपर्सचे मालक ललितकुमार जैन यांनी वारंवार टाळाटाळ केली. तसेच ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्सच्या कामागारांना वारंवार धमकावणे, खोटे अदखलापत्र गुन्हे दाखल करणे व इतर माध्यमातून त्रास देण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे काकोली मंडल यांनी याप्रकरणी १७ एप्रिल २०१८ रोजी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही.

दरम्यान, काकोली मंडल यांनी स्वतः केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी कुलनेशन गृहप्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या असता कुमार बिल्डर्सचे मालक हेमकार ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे अतुल चोरडिया, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग, व्हीटीपी ग्रुपचे संतोष जैन, साईटवरील अभियंत्यांनी त्यांना धक्काबुक्की करत धमकी दिली. तसेच अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. या सर्व घटनेचे चित्रीकरण करून लोणीकंद पोलिस ठाण्यात पुन्हा १९ जुलै २०१८ रोजी तक्रार करण्यात आली. परंतु, पोलिसांनी या प्रकरणात आजपर्यंत काहीच कारवाई केली नाही.

त्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चा व समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी पुण्यातील पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून कुमार बिल्डर्सचे मालक ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे मालक अतुल चोरडिया, व्हीटीपी ग्रुपचे मालक संतोष जैन, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग तसेच गोळीबार करणारा संजूसिंग रामेश्वरसिंग व इतर कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात दोनवेळा तक्रार करूनही गुन्हा दाखल न करणाऱ्या लोणीकंद पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.