पुण्यातील प्रसिध्द हॉटेल्स गलिच्छ; एफडीएच्या पाहणीत उघड

1216

पुणे, दि. १७ (पीसीबी) – पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेज रस्त्यावरील वैशाली, रुपाली, कॅफे गुडलकसारखे हॉटेल्स  स्वच्छतेच्या बाबतीत गलिच्छ असल्याचे एफडीए( फूड्स अॅण्ड ड्रग्स) विभागाच्या पाहणीतून समोर आले आहे. या हॉटेल्सचे भटारखाने अत्यंत गलिच्छ आणि आरोग्यदृष्ट्या योग्य नसल्याचे उघड झाले आहे. 

स्वच्छतेसंदर्भात घालून दिलेल्या निकषांची पूर्तता होते का, हे तपासण्यासाठी एफडीए अधिकाऱ्यांनी कॅफे गुडलक, वैशाली,रुपाली, याना सिझलर्स या हॉटेल्सवर धाडी टाकल्या. यावेळी वैशाली हॉटेलच्या किचनमध्ये सर्वत्र कचरा साचून होता. अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे चमचे, वाडगी इत्यादी भांडीही अस्वच्छ असल्याचे दिसून आले. फ्रीझरही स्वच्छ नव्हते. तसेच स्वयंपाक करणारे शेफही स्वच्छतेबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याचे समोर आले आहे. एफडीएने दिलेले कोणतेही स्वच्छतेचे सर्टिफीकेट हॉटेलकडे नव्हते. रुपालीमध्येही अशीच परिस्थिती होती.

कॅफे गुडलकमध्ये तर किचन बरेच दिवस झाडले नव्हते. येथे भिंतींवर जळमटे होती. स्वयंपाकासाठी वापरलेली भांडीही बरेच दिवस धुतली नव्हती. तर ताजे खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले होते. तर याना सिझलर्समध्ये स्वयंपाक्यांसाठी कपडे बदलण्यासाठी वेगळी रूमही नसल्याचे समोर आले आहे. या सर्व हॉटेलांना एफडीएने नोटीस दिली आहे. यावर एफडीएच्या सर्व निकषांची पूर्तता करणे अशक्य असल्याचे  वैशालीचे मालक रंजीत शेट्टी यांनी म्हटले आहे.