पुण्यातील प्यासा बारचा पत्ता माहित असून न सांगितल्याने एकावर गोळीबार

0
644

पुणे, दि. १३ (पीसीबी) – प्यासा बार अॅण्ड रेस्टोरंटचा पत्ता माहिती असूनही तो न सांगिल्याच्या रागातून एका तरुणाच्या पायावर गोळीबार करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा पुण्यात घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी तातडीने आरोपींना बेड्या ठोकल्या.

सनी चौधरी असे पायाला गोळी लागून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी अंबादास होंडे याला अटक केली असून त्याचे दोघे साथीदार अद्याप फरार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, तिघे आरोपी कारमधून प्रवास करत होते. तिघेही अहमदनगरचे असून हॉटेल प्यासाला जात होते. रस्त्यात त्यांनी सनी चौधरीला पत्ता विचारला. मात्र सुरुवातीला त्याने आपल्याला पत्ता माहिती नसल्याचे सांगितले. पण जेव्हा त्यांनी तुला कुठे सोडायचे असेल तर सोडतो असे सांगितले तेव्हा मात्र त्याने हॉटेलचा पत्ता माहिती असल्याची माहिती दिली.

यामुळे कारमधील तिघे आरोपी चिडले आणि तुला पत्ता माहिती असूनही आधी का सांगितला नाही याचा जाब विचारला. गाडीत बसल्यानंतर आरोपींनी सनीला दमदाटी केली आणि त्याच्या पायावर गोळीबार केला. हल्ल्यात सनी चौधरी गंभीर जखमी झाला असून ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते पण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने कारची माहिती मिळवत अंबादास याला अटक केली आहे. तर त्याचे इतर दोघे साथीदार फरार आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.