Pune

पुण्यातील पोलीस उपायुक्तांच्या प्रस्तावात परस्पर खाडाखोड; पोलीस अंमलदार निलंबित

By PCB Author

September 08, 2021

पुणे, दि.०८ (पीसीबी) : पोलीस उपायुक्तांच्या प्रस्तावात पोलीस अंमलदाराने परस्पर स्वहस्ताक्षरात खाडाखोड करुन कालावधीत बदल केलेला अहवाल जिल्हा सरकारी कार्यालयात दाखल केला. या खाडाखोडीची पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी गंभीर दखल घेऊन एका पोलीस अंमलदाराला निलंबित केले आहे. पोलीस नाईक स्वप्नील बारटक्के असे त्यांचे नाव आहे. स्वप्नील बारटक्के यांची उत्तमनगर पोलीस ठाण्यात नेमूणक करुन त्यांना परिमंडळ ३ च्या कार्यालयात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. कोथरुड येथील एका गुन्ह्यात प्रस्तावित कार्यवाहीबाबत अभिप्राय मिळविण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी केला होता.

तो शिवाजीनगर येथील जिल्हा सरकारी वकिलांकडे देण्यासाठी १ सप्टेंबर रोजी बारटक्के यांच्याकडे दिला होता. त्यांनी या प्रस्तावात पोलीस उपायुक्त यांची पूर्व परवानगी न घेता परस्पर स्वहस्ताक्षरात त्यांच्या प्रस्तावात नमूद केलेल्या दिवसाच्या कालावधीच्या जागी १ खोडून ७ अशी खाडाखोड करुन कालावधी बदल झालेला अहवाल जिल्हा सरकारी कार्यालयात दाखल करुन कर्तव्यात गंभीर कसुरी केली. हा प्रकार समजताच पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी स्वप्नील बारटक्के याला निलंबित केले आहे.