पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर, आयएएस अधिकारी नेमा – अजित पवार

0
251

पुणे, दि. ४ (पीसीबी) – कोरोनाची साथ पुण्यात आटोक्यात का नाही येत? मुंबईत जर ही साथ नियंत्रणात येऊ शकते तर पुण्यात का नाही? असे प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चाचण्यांसाठी आता नवा प्रशासकीय अधिकारी नेमा अशा कडक शब्दांमध्ये पुण्यातल्या अधिकाऱ्यांना खास आपल्या शैलीत सूचना केल्या. काही रुग्णालयांमध्ये डॉक्टर कोविड कक्षांमध्ये जात नाहीत अशा तक्रारी आहेत. पुण्यात पुरेशा कोविड चाचण्या व्हाव्यात म्हणून पुण्यासाठी टेस्टिंग इनचार्ज IAS अधिकारी नेमा अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.

पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांसह ग्रामीण भागांमधली कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून पुणे जिल्ह्यासाठी टेस्टिंग इनचार्ज नेमा. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतेली एका अधिकाऱ्याची नेमणूक करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

पुणे शहरात शुक्रवारी दिवसभरात नव्याने ८०७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर पिंपरीत २७६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पुण्यातील रुग्णांची संख्या आता  १९ हजार ८४९ झाली आहे. तर आज दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमुळे पुण्यात आत्तापर्यंत ६८५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या ६१९ जणांची  तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १२ हजार २९० रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरीतही वाढला कहर

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी तब्बल ३४४ आणि शुक्रवारी २७६ कोरोना बाधित रुग्ण आढळले. शहरातील बाधितांची संख्या ३ हजार ७७६ वर पोहचली आहे. तर आज ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक मृत्यू हा हा ग्रामीण भागातील आहे. पिंपरीत आत्तापर्यंत ८५ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तसंच आजवर २ हजार २३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजही ७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. महापालिकेची यंत्रणी अपुरी आहे आणि खासगी रुग्णालयांतील उपचार परवडत नसल्याने नागरिकांच कोंडी होत आहे.