पुण्यातील ‘त्या’ शाळेची चौकशी करून कारवाई करणार – विनोद तावडे

0
386

पुणे, दि. ५ (पीसीबी) – कोथरुड येथील माईर्स विश्वशांती गुरुकूलमधील विद्यार्थीनीसाठी लागू केलेल्या वादग्रस्त अटींची चौकशी करण्यासाठी पुण्यातील शिक्षण उपसंचालक एक समिती शाळेत पाठवणार आहे. या समितीने विद्यार्थी आणि पालकांना भेटून आपला अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

माईर्स विश्वशांती गुरुकुल शाळेमध्ये सायकल लावण्यासाठी भरमसाठ शुल्क आकारणी केली आहे. मुलींवर ठरावीक रंगाच्या अंतर्वस्त्रांची सक्ती केली आहे. मुलींनी पांढऱ्या किंवा स्कीन  रंगाचीच अंतर्वस्त्रे घालावीत, असे नियमावलीत म्हटले होते. मुलींच्या अंतर्वस्त्राबाबत सक्ती करताना मुलांच्या अंतर्वस्त्रांबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते. यावरून वाद निर्माण झाला होता. शाळा प्रशासनावर कारवाई करण्यासाठी पालकांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांकडे तक्रारी केल्या होत्या.

अखेर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्यातील शिक्षण उपसंचालक एक समिती शाळेत पाठवणार आहे. ही समिती विद्यार्थी आणि पालकांना भेटून आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.