पुण्यातील कॉसमॉस बँक लूटप्रकरणी मुंबईतून एकाला अटक

0
633

पुणे, दि. १६ (पीसीबी) – कॉसमॉस बँकेचा सव्‍‌र्हर हॅक करून ९४ कोटींची रोकड लूटल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून एकाला अटक केली.  याप्रकरणी आता एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.

अँथोनी ऑगस्टीन (वय ४०, रा. मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी २४ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यापूर्वी नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, सध्या रा. विरार, मूळ रा. ओरिसा), मोहंमद सईद इक्बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (वय ३०, रा. भिवंडी) शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, नांदेड) फहिम मेहफुज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्प्लेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. आझादनगर, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, इंदूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रात मिळालेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते. चित्रीक रणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात येत होता. आरोपी ऑगस्टीन, महाराणा,अली, शेख, राठोड आणि खान यांनी कोल्हापुरातून पैसे काढण्यासाठी ९५ बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात शनिवारी अटक केलेल्या ऑगस्टीनला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.