Pune

पुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला; ९४ कोटी हाँगकाँग बँकेत ट्रान्सफर

By PCB Author

August 14, 2018

पुणे, दि. १४ (पीसीबी) – पुण्यातील गणेश खिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच सर्व्हर हॅक करून अनेक खातेधारकांच्या डेबिट कार्ड आणि रुपी कार्डाचीची माहिती चोरण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.   तब्बल ९४ कोटी रुपये हॉंगकॉंग येथील बँकेत ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  कॉसमॉस बँकेचे गणेशखिंड रोडवरील मुख्यालयातील व्हिसा आणि रुपी डेबीट कार्डधारकांचे १२ हजार व्यवहारातून ७८ कोटी रुपयांचे आणि रुपे कार्डच्या २ हजार ८४९ व्यवहारामधून २ कोटी ५० लाख रुपयांचे परदेशात व्यवहार करण्यात आले आहेत. १४ हजार व्यवहारातून तब्बल ८० कोटी रुपये काढल्याचे समोर आले आहे.

हे सर्व व्यवहार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत करण्यात आले आहेत . त्यानंतर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅकरने हाँगकाँग येथील एका बँकेच्या खात्यामध्ये १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करून ते पुन्हा काढून घेतल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणाचा तपास चतु:श्रृंगी पोलिस करत आहेत.