Pune

पुण्यातील एआयएसएसएमएसच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे कोंढणपूर, कल्याणमध्ये स्वच्छता अभियान

By PCB Author

October 04, 2018

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उन्नत भारत अभियान अंतर्गत कोंढणपूर आणि कल्याण या दोन गावांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. तेथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक वर्ग, वृक्षारोपण, गावातील मंदिराची स्वच्छता, गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती, स्वच्छता विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयात संगणक प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांच्या खेळण्याच्या साहित्यांचे नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर खेळणी आरसीसी  साहित्य वापरून बसविण्यात आले. शाळेतील संगणक दुरुस्त करून अत्याधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

गावातील प्रत्येक गल्लीत आणि मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावकऱ्यांमध्ये स्वच्छेतेविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता हि सेवा या कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छता या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पारितोषक वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच बाळासाहेब मुजुमले, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच उन्नत भारत अभियानचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नाना शेजवळ आणि प्रा. अनिल कदम, व गावकरी उपस्थित होते. या  सर्व कार्यक्रमांसाठी प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमाने, बाळासाहेब मुजमुले यांनी मार्गदर्शन केले.