Pune

पुण्याचे पालकमंत्री फडणवीस नव्हे चंद्रकांत पाटील

By PCB Author

August 09, 2022

पुणे,दि. ९ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. या विस्तारात पुण्यातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. आता पुण्याचे पालकमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदांदाकडेच राहणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना गेल्या महिनाभरात पुण्याच्या पालकमंत्रीपदाचीदेखील चर्चा सुरू होती. पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:कडे घेणार असा त्या चर्चेचा सूर होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या आगामी निवडणुका व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी स्वत: फडणवीस पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणार, असा या चर्चेचा सूर होता. मात्र, मंत्रीमंडळाच्या आजच्या विस्तारानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडेच येणार अशी सूत्रांची माहिती आहे.

मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या खातेपाट तसेच पालकमंत्रीपच्याा जबाबदारीचे वाटप करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या ठिकाणी झेंडावंदन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे राज्यातील किमान १८ जिल्ह्याच्या ठिकाणी तरी पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा वंदन होण्यासाठी तातडीने पालकमंत्री व खातेवाटप होईल, असे सांगण्यात येत आहे.

आजच्या विस्तारात १८ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यात एकुण ३६ जिल्हे आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळाचा दुसरा विस्तार होईपर्यंत प्रत्येक मंत्र्यांकडे दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूरचे असले तरी २०१९ मध्ये त्यांनी पुण्यातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून खासदार झालेल्या गिरीश बापट यांनी पालमकमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पुढचे सुमारे सहा महिने चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे आता पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.