पुण्याचे नाव जिजापूर करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

953

पुणे, दि. १२ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज तर फैजाबादचे अयोध्या असे करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुण्याचे नाव जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले आहे. त्यामुळे त्यांचेच नाव या शहराला देण्यात यावे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

नामांतराच्या मागणीचे निवेदन आज (सोमवार) पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, असे संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी  सांगितले.  औरंगाबादचे संभाजी नगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि पुण्याचे जिजापूर असे नामांतर सरकारने करावे. त्यामुळे सध्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास समजेल. पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि पुण्यात जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला आहे. त्यामुळे भाजप सरकारने त्वरीत पुण्याचे नाव जिजापूर करावे, असे संघटनेने म्हटले आहे.