पुणे शहराचे महापौर मुरली मोहळसुध्दा कोरोना पॉझिटिव्ह; निगडीचे भाजप नगरसेवक उत्तम केंदळेही रुग्णालयात

0
459

पिंपरी, दि.४ (पीसीबी) – कोरोनाने राजकीय कार्यकर्त्यांची भंबेरी उडाली आहे. पुणे शहराचे महापौर मुरली मोहळ हेसुध्दा कोरोना पॉझिटिव्ह निघाले. कोरोना संदर्भातील विविध बैठकांचा सपाटा त्यांच्या अंगलट आला आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमधील जेष्ठ नगरसेवक माजी विरोधीनेते दत्ता साने यांचे निधन झाल्याने या शहरातील सर्वच राजकीय कार्यकर्ते जाम हादरले आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या प्रमाणेच शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे, चंदा लोखंडे, माजी उपमहापौर शैलजा मोरे यांचे चिरंजीव आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते अनुप मोरे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, दोन नगरसेविकांचे पती हे बाधित आहेत. आता भाजपचे यमुनानगरचे नगरसेवक उत्तम केंदळे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड सहरातील नेते, नगरसेवक, कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती बाधित निघत असल्याने खळबळ आहे. सतत जनतेच्या संपर्कात अथवा मदतीला जाणे, भेटी देणे हे आता अंगलट येते आहे. कोरोना बाधित राजकीय मंडळींच्या यादीत आता रोज एक आजी-माजी नगरसेवक दिसतो आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांची तब्बेत लवकर सावरते आहे. आमदार महेश लांडगे यांची तब्बेत सुधारते आहे. शहरात गेले तीन दिवस ३०० च्या दम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. वायसीएम हाऊसफूल्ल आहे, तर खासगी रुग्णालयांतून जागा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. पुढचा आठवडा परिक्षा पाहणार असेल असा अंदाज जाणकार व्यक्त करतात.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता पुढे आली आहे. भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी प्रथम आयुक्तांना भेटून एक निवेदन दिले आणि पुन्हा लॉकडाऊनची मागणी केली. पाठोपाठ महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवक नामदेव ढाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर, भाजपचे स्विकृत सदस्य बाबू नायर यांनीही पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने विचार करायला हरकत नाही, अशी आग्रही भूमिका मांडली आहे.

कोरोनाबद्दल बोलताना केंदळे म्हणाले, मला दोन दिवसांपुर्वी ताप आला, कणकण वाटली म्हणून तपासणी केली. त्यात मी पॉझिटिव्ह निघालो, पण तब्बेत ठणठणीत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेतो आहे, घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनीही आपण होऊन मास्क वापरणे, अंतर ठेऊन बोलणे, गर्दी न करणे हे पाळले पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या समस्या सोडविताना थोडे अधिक गाठी भेठी झाल्या. कुठे बाधा झाली ते माहित नाही, पण निश्चित लवकर बरा होईल याची खात्री वाटते.