Pune

पुणे विद्यापीठाच्या एक्झिट पोलमध्ये युतीला ३३ ते ४४ जागा मिळण्याचा अंदाज

By PCB Author

May 22, 2019

पुणे, दि. २२ (पीसीबी) – बहुतांश एक्झिट पोलने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचा एक्झिट पोल समोर आला आहे. यात  भाजपला १७ ते २३, शिवसेनेला १६ ते २१, राष्ट्रवादी काँग्रेसला ३ ते ९ आणि काँग्रेसला १ ते ६ जागा मिळण्याची शक्यता  वर्तवली आहे.  

या विद्यार्थ्यांनी रॅंडम फॉरेस्ट मॉडेल” ही पद्धती वापरून लोकसभा निवडणुकांचे  एक्झिट पोल  दिले आहेत. निवडणुकांचे अंदाज देण्यासाठी ही पद्धत भारतात पहिल्यांदाच वापरण्यात आली आहे. संख्याशास्त्र विभागातील एम.एस्सी. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी विनय तिवारी, आर. विश्वनाथ आणि शरद कोळसे या तीन विद्यार्थ्यांनी असिस्टंट प्रोफेसर डॉ. आकांक्षा काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक्झिट पोल तयार केला आहे.

यासाठी लागणारी  आकडेवारी त्यांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरुन मिळवली.  तर जनमानसाचा सध्याचा कल ओळखण्यासाठी आवश्यक असलेली माहिती “सीएसडीएस–लोकनीती” यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या सर्वेक्षण अहवालांमधून घेतली आहे.

या माहितीमध्ये सध्याच्या सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया, पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारांची लोकप्रियता, मागच्या निवडणुकीतील आपले मत यंदा बदलू इच्छिणारे मतदार यांचा समावेश आहे. या अंदाजांसाठी रॅंडम फॉरेस्ट मॉडेल वापरण्यापूर्वी त्याच्या आधारावर २००९ आणि २०१४ च्या निवडणुकांचे अंदाज पडताळून पाहण्यात आले.

हे अंदाज प्रत्यक्ष निकालांशी पडताळून पाहिले . ते उमेदवारांच्या विजय/पराभवाबद्दल जवळजवळ  ९६ टक्के जुळत आहेत. ही अचूकता इतर कोणत्याही मॉडेलच्या तुलनेत सर्वाधिक आहे. २०१४  च्या निवडणुकांमधील इतर अनेक एक्झिट पोलच्या निकालांपेक्षा हे निकाल अधिक अचूक असल्याचे दिसून आले आहेत.  त्यामुळे या अभ्यासात माहितीच्या विश्लेषणासाठी या पद्धतीचा वापर करण्यात आला, असे डॉ. काशीकर यांनी सांगितले.