Pune

पुणे विद्यापीठजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

By PCB Author

November 23, 2018

पुणे, दि. २३ (पीसीबी) – दुभाजकाला धडकुन झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.२२) मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे विद्यापीठ ते औंध दरम्यानच्या रस्त्यावर घडली.

प्रतीक प्रमोद रामशेट्टीवर (वय २९, रा. चंद्रपुर) आणि राहुल रामचंद्र नायर (वय २८, रा. हरी ओम सोसायटी, औंध) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मयत प्रतीक आणि राहुल हे दोघे त्यांच्या आणखी दोन मित्रांसोबत कारने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरुन औंधच्या दिशेने जात होती. त्या वेळी कस्तुरबा वसाहतीजवलील केंद्रीय विद्यालयासमोर मोटारीचालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव मोटारी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन आदळली. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या टेम्पो ट्रव्हलरने अपघातग्रस्त मोटारीला जोरदार धडक दिली. या जबर धडकेत कारमधील प्रतीक आणि राहुल या दोघांचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच चतुश्रृंगी पोलिस तत्काळ घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. चतुश्रृंगी पोलिस अधिक तपास करत आहेत.