पुणे वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम; वाहतुकिच्या नियमानुसार प्रामाणिकपणे वाहन चालवणाऱ्यांना देणार गिफ्ट कूपन

0
419

पुणे, दि. १४ (पीसीबी) – वाहतूक पोलिस नेहमीच अपल्या कामाप्रमाणे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंड आकारातात किंवा वाहन जप्त करतात. मात्र या उलट आता हेच पोलीस वाहतुकिच्या नियमानुसार प्रामाणिकपणे वाहन चालवणाऱ्यांना गिफ्ट कूपन भेट म्हणून देणार आहेत. वाहतूक पोलिसांच्या “आभार’ या योजनेद्वारे आता पुणेकरांना कोणत्याही खरेदीसाठी दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात शहरातील १३५ व्यावसायिक सहभागी झाले आहेत.

पुणेकरांना काहीसा दिलासा देणारी ही “आभार’ योजना दोन दिवसांपासून शहरात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास सुरवात झाली. दीडशेजणांना मोबाईलवर “गिफ्ट कूपन’ कोड दिले आहेत. या योजनेची अधिकृत घोषणा वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी गुरुवारी केली. या वेळी विविध कंपन्यांचे व्यावसायिक, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.

असे मिळणार “गिफ्ट कूपन’ …

वाहतूक पोलिसांनी एखाद्या वाहनचालकास पकडल्यास, संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी वाहतूक पोलिसांच्या मोबाईल ऍपवर संबंधित चालकाच्या वाहनावर नियमाचे उल्लंघन केल्याचा दंड आहे का? याची तपासणी करेल. दंड नसल्यास ते त्यांच्याकडील गिफ्ट कूपन ऍपवर चालकाचा मोबाईल क्रमांक टाकतील. त्यानंतर चालकांना मेसेजद्वारे “कूपन कोड’ मिळेल. तो संबंधित व्यावसायिकांना दाखविल्यास किमान १०० रुपयांपर्यंत किंवा खरेदीच्या दहा टक्‍क्‍यांपर्यंत चालकांना सवलत मिळणार आहे. यामध्ये शहरातील नामांकित हॉटेल, रेस्टॉरंट, बिर्याणी हाउस, केकशॉप्स, मॉल्स, विविध वस्तू, कपडे, दागिने व अन्य सर्व प्रकारची दुकाने, व्यावसायिक अशा १३५ जणांनी या योजनेत भाग घेतला आहे. तसेच हे कूपन एक महिन्यापर्यंत वापरता येणार आहे.