पुणे लोहमार्ग पोलिसांची कारवाई: भीक मागण्यासाठी चार महिन्यांच्या बाळाला पळवणाऱ्या महिलेला अटक

0
1088

पुणे, दि. २३ (पीसीबी) – ‘कडेवर लहान मूल असेल तर लोक जास्त भीक देतात’ म्हणून एका भीक मागणाऱ्या महिलेने पुणे स्टेशन येथून चार महिन्यांच्या बाळाला पळवून नेले होते. पुणे लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस आणि मुंबई स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपी महिलेला अटक केली असून पळवून नेलेले बाळ सुखरुप त्याच्या आईच्या ताब्यात दिले आहे.

मनीषा काळे (वय २५, रा. हडपसर रेल्वे स्टेशन जवळील झोपडपट्टी, मूळ रा. मु. पो. भुतकर वाडी, भिंगार देवमळा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या भिकारी महिलेचे नाव आहे. संगीता आनंद कंक (वय २५, रा. कोपर्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री संगीता या त्यांच्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन पुणे रेल्वे स्टेशन येथून गावी निघाल्या होत्या. रेल्वे येण्यास वेळ असल्याने त्या त्यांच्या बाळाला पुड्यात घेऊन झोपी गेल्या. यादरम्यान मनीषा काळे या आरोपी महिलेने संगीता यांचे बाळ घेऊन पसार झाली. यावर संगीता यांनी तातडीने पुणे लोहमार्ग पोलिसात फिर्याद दिली. लोहमार्ग पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यासाठी सारे पुणे शहर पिंजून काढले. यावेळी त्यांना मुंबईतील जोगेश्वरीमधील एका पुलाखाली एक संशयित महिला भीक मागत असून तिच्याकडे लहान मुल असल्याची माहिती मिळाली. यावर पुणे लोहमार्ग पोलिसांनी ओशिवरा पोलीस आणि मुंबई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना संपर्क करुन तिला ताब्यात घेण्यास सांगितले आणि तातडीने मुलाच्या आई आणि कुटूंबीयांना घेऊन तेथे धाव घेतली. यावेळी पोलिसांच्या चौकशी मध्ये ते मुल आरोपी महिलेचे नाही हे समजले. तसेच संगीता यांनी आपल्या मुलाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. तर आरोपी मनिषा काळेने कबुली जबाबात ‘कडेवर लहान मूल असेल तर लोक जास्त भीक देतात’ म्हणून मुल चोरल्याची कबुली दिली. तिला अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस कर्मचारी धनंजय दुगाने, सुनील कदम, श्रीकांत भोसले, आनंद कांबळे, अमरदीप साळुंके, अनिल दांगट, दिनेश बोरनारे, जनार्दन गर्जे, विक्रम मधे, स्वप्नील कुंजीर, निलेश बिडकर, राजेश कोकाटे, प्रभा बनसोडे, अश्विनी येवले, मनीषा बेरड, चालक सुधाकर जगताप, ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार रणजित कुरील, महिला पोलीस शिपाई स्वरा साळकर, पोलीस हवालदार शिर्के, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुरी, आंबोली पोलीस ठाणे मुंबई यांच्या पथकाने केली.