“पुणे मेट्रो प्रकल्पामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राचा फायदाच”

0
195

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : महामेट्रोच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील मध्यवर्ती भागासोबतच आजूबाजूचा भाग देखील जोडला जाणार आहे. नागरिकांना प्रवास करण्यासाठी मेट्रोसारखा सर्वोत्तम व वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध झाल्याने याचा सकारात्मक परिणाम बांधकाम व्यवसायावर देखील होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली

क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 38 व्या सर्वसाधारण सभेत मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील बांधकाम व्यवसाय प्रकल्पाचा कसा फायदा होऊ शकेल या विषयावर ते बोलत होते. महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, वास्तुविशारद शितेश अग्रवाल, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे, सचिव अरविंद जैन, उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, मनीष जैन, अमर मांजरेकर, राजेश चौधरी, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना दीक्षित म्हणाले, “कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर देखील पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम जोरात सुरू असून, नजीकच्या भविष्यात शहरात मेट्रो धावताना दिसेल. यासोबतच शहराचा विकासही गती घेईल, बांधकाम व्यवसाय क्षेत्राला याचा विशेष लाभ होईल. मेट्रो प्रकल्पाच्या मार्गावरील प्रकल्पांसाठी वाढीव एफएसआय बांधकाम व्यावसायिकांना उपलब्ध होईलच याशिवाय शिवाजीनगर व स्वारगेट येथील मल्टी मोडल स्टेशनचाही फायदा मिळू शकणार आहे.”

भविष्याचा विचार करीत पुणे शहरात मेट्रोच्या तुलनेत कमी किंमत मात्र तितकीच प्रभावी अशी निओ मेट्रो आणण्याचा देखील महामेट्रोचा विचार असून त्याद्वारे बांधकाम व्यवसायाला आणखी गती मिळू शकणार आहे. निओ मेट्रोची प्रवासी क्षमता ही ताशी 15 हजार प्रवासी इतकी असणार असून मेट्रोच्या तुलनेत तिची किंमत 60 ते 70 कोटी रुपये प्रती किलोमीटर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विमानतळाबरोबरच इतर सर्व ठिकाणी मेट्रोच्या वतीने फिडर सर्व्हिस सुविधा पुरविण्यात येणार असून खाजगी वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाढणाऱ्या वायूप्रदूषणाला आळा घालणे देखील यामुळे शक्य होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

पुणे मेट्रोचे वास्तुविशारद शितेश अग्रवाल म्हणाले की, मेट्रो प्रकल्प आणि मेट्रो स्टेशन्सच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात विकास होणार असून यामुळे पुणे शहरात अमूलाग्र बदल होतील. मेट्रो प्रकल्पाच्या बाजूने बांधकामांचे मूल्य देखील नजीकच्या भविष्यात नक्कीच वाढलेले दिसेल. याबरोबरच मेट्रोमुळे शहराच्या कार्यपद्धतीत देखील बदल होणार आहेत. घरापासून कार्यालयापर्यंतच्या प्रवासाची वेळ ही सुद्धा लक्षणीयरीत्या कमी होईल. त्यामुळे शहराची पुनर्रचना करण्यासाठी क्रेडाई सदस्यांकडून आम्ही सहभागाची व एकत्रित काम करण्याची अपेक्षा करतो आहोत.