पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाची पिंपरी-चिंचवडमध्ये दुरवस्था; आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले!

0
1454

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या रस्त्याचे काम करणारी रिलायन्स कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि. २३) खडेबोल सुनावले. या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी जागेवर जाऊन या द्रुतगती महामार्गाची दुरवस्था दाखवली. या महामार्गाची दुरवस्था तातडीने दूर करण्यासोबतच महामार्गालगत तातडीने सुशोभिकरण करण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली. रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.   

पुणे-मुंबई हा देशातील पहिला द्रुतगती महामार्ग आहे. हा द्रुतगती मार्ग सहापदरी करण्याचे काम रिलायन्स कंपनीला मिळालेले आहे. या कंपनीमार्फत सध्या काम सुरू आहे. हा महामार्ग वाकड ते रावेत-किवळे दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जातो. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे सुशोभिकरण करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे या महामार्गाच्या शेजारचे सर्व्हिस रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे.

या सर्व बाबींची दखल घेऊन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि. २३) बैठकीसाठी पाचारण केले होते. या बैठकीत त्यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला. महामार्गाची दुरवस्था दूर करण्यासाठी पुरेसे लक्ष दिले जात नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुशोभिकरण करण्यासाठी आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अशा प्रकारचा निष्क्रिय कारभार यापुढे खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले.

त्यानंतर आमदार जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जागेवर गेले. अधिकाऱ्यांना जागोजागी द्रुतगती महामार्गाची पाहणी करायला लावली. वाहनचालकांना द्रुतगती महामार्गावर प्रवासाला अडथळा येऊ नयेत यासाठी उभारण्यात आलेल्या ग्रेड-सेपरेटरची झालेली दुरवस्था, सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था, महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे, वाकड ते रावेत-किवळे दरम्यान एकाही ठिकाणी महामार्गाजवळ न केलेले सुशोभिकरण त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवले. तसेच आमदार जगताप यांनी ही सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.