पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आजपासून तीन दिवस “ब्लॉक”; धोकादायक दरडी हटवण्याच्या कामाला सुरूवात

0
461

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे) धोकादायक दरडी हटविण्याच्या कामाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून, त्यासाठी ‘एक्स्प्रेस वे’वर उद्यासून (ता. २१) तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) एक्स्प्रेस वेवरील दरडी हटविण्याचे काम सुरू असून, त्यासाठी २१ ते २३ मे दरम्यान सकाळी दहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत प्रत्येक तासाला पंधरा मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

‘एमएसआरडीसी’कडून एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्से खिंड येथे दरड आणि मोठे दगड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या कामासाठी एक्स्प्रेस वेवर १४ ते १७ मे दरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. महामंडळाने पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली असून, त्यासाठी २१ ते २३ मे या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी दहा ते साडेचार वाजेपर्यंत प्रत्येक तासाला पंधरा मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालवधीमध्ये दर तासाला १५ मिनिटांसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

ब्लॉकचे वेळापत्रक

(२१ ते २३ मे या दरम्यान)

असे असणार ब्लॉक :

पहिला ब्लॉक : सकाळी १० ते १०.१५

दुसरा ब्लॉक : सकाळी ११ ते ११.१५

तिसरा ब्लॉक : सकाळी १२ ते १२.१५

चौथा ब्लॉक : दुपारी २ ते २.१५

पाचवा ब्लॉक : दुपारी ३ ते ३.१५

सहावा ब्लॉक : दुपारी ४ ते ४.१५