पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी साखर आयुक्तपदी बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त

0
653

पुणे, दि. ११ (पीसीबी) – कोरोना नियंत्रणात पुणे महापालिका प्रशासनाला अपयश आल्याने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पुणे महानगर क्षेत्रिय विकास प्राधिकऱणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी गायकवाड यांची पुणे महापालिका आयुक् म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या सहा महिन्यांत बदली झाल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

पुणे शहरात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत नसल्याने नाराजीचा सूर होता. रोज सरासरी ८०० ते १००० अशा प्रमाणात रुग्णांची वाढ आणि मृतांची संख्या जवळपास ८०० झाल्याने राजकीय नेत्यांनी टिकेची झोड उठवली होती. दरम्यान पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यातील बैठकीत आणखी चार आयएएस अधिकारी नियुक्त करण्याती सुचना केली होती. कोरोनाचा प्रसार थांबत नसल्याने अखेर सोमवारी पासून दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करणे भाग पडले.

साखर आयुक्त सौरभ राव यांची विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी तसेच माहापालिका आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्या अुभवाचा फायदा कोरोना नियंत्रणासाठी होईल, म्हणून त्यांची नियुक्ती महत्वाची मानली जाते. दीपक म्हैसकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या जागेवर राव यांची नियुक्ती होणार आहे. कृषी आयुक्त सुहास दिवसे याची पीएमआरडीए मुख्याधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.