पुणे-बेंगळुरु महामार्गावरील वाहतूक सोमवारी सुरू होण्याची शक्यता

0
630

कोल्हापूर, दि. ११ (पीसीबी) – पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक सुरू करण्यासाठी आज (रविवारी)  सकाळी चाचणी घेण्यात आली. मात्र,  पुराच्या पाण्याला वेग असल्याने महामार्गावरील वाहतूक बंद राहील. सोमवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर   वाहतूक सुरू होण्याची  शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी  दिली.

महापुरामुळे गेल्या सहा दिवसांपासून पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग  बंद आहे.  रस्त्यारून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी अर्धा ते पाऊण फूटाने कमी झाली आहे.  अद्यापही तीन ते साडे तीन फूट पाणी महामार्गावर आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहतूक करता येणे शक्य आहे का? याची चाचपणी पाण्याचा टँकर पोकलेनसह पाठवून घेतली. महामार्गावरील साचलेल्या पाण्यातून हा टँकर गेला. मात्र पाण्याला वेग असल्याने महामार्गावरून वाहतूक सुरू करणे सुरक्षित नाही. सांगली फाटा येथे महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहनांची घेतलेली चाचणी अयशस्वी झाली आहे.  त्यामुळे  महामार्गावरील वाहतूक बंदच राहणार  आहे, असे  पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. महामार्ग बंद असल्याने  बंगळुरूकडे जाण्यासाठी सोलापूर मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही  देशमुख यांनी केले आहे.