Pune

पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बस उलटली; दोघांचा मृत्यू

By PCB Author

July 14, 2018

पुणे, दि. १४ (पीसीबी) – पुणे ­-बंगळुरू महामार्गावर बडेकोळमठ येथे बस उलटून दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (शनिवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आज (शनिवारी) साडेसहाच्या सुमारास बेळगावहून हुबळीच्या दिशेने बस निघाली होती. उतारावरून जात असताना बसमध्ये तांत्रिक बिघाड झाली. बसचे ब्रेक लागत नव्हते. त्यामुळे ड्रायव्हने बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रस्त्यामध्ये असलेल्या दुभाजकाला आदळून ही बस उलटली. यात दोन जण जागीच ठार झाले आहेत.

या अपघातात बसचालक अशोक धुंडी (वय ५०) आणि एक वृद्ध प्रवाशी यांचा समावेश आहे. तसेच बसमध्ये असलेल्या प्रवाश्यांपैकी चार जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त कळताच हिरेहबागेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. पोलिस तपास करत आहेत.