Pune

पुणे पोलीस दलात अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त बॉम्ब शोधक रोबोट दाखल होणार

By PCB Author

October 09, 2018

पुणे, दि. ९ (पीसीबी) – पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त “दक्ष’ हा रोबोट घेतला आहे. आगामी सहा महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर “दक्ष’ पुणे पोलिस दलामध्ये दाखल होणार आहे. याबाबत “टेक्‍नॉलॉजी ऑन ड्युटी’ येणार असल्याची माहिती खुद्द पुणे पोलिस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी ट्विटरद्वारे दिली.

मागील काही वर्षांपासून पुण्यामध्ये बॉम्बस्फोटाच्या घटनांबरोबरच दहशतवादी कारवायाही उघडकीस आल्या आहेत. या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकावर बॉम्ब शोधण्याची महत्वाची जबाबदारी आहे. या पथकास बळकटी देण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यादृष्टीने या पथकामध्ये “दक्ष’ या रोबोटचा प्रायोगिक तत्त्वावर समावेश करण्यात येणार आहे.  डिआरडीओने “दक्ष’ या रोबोटची निर्मिती केली असून तो बॉम्ब शोधण्याबरोबरच ते नष्ट करण्याचेही  काम करतो. यामुळे पुणे पोलिस दलातील  बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बळकटी मिळणार आहे.