Pune

पुणे पोलिसांनी देशभरातून अटक केलेल्या पाचही आरोपींची नावे एफआयआरमध्ये नाहीत

By PCB Author

August 31, 2018

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात २८ ऑगस्टला देशभरातील विविध ठिकाणाहून सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वरवरा राव, गौतम नवलखा आणि वर्नोन गोन्साल्विस यांना पुणे पोलिसांनी अटक केली. सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर या पाचही आरोपींना ५ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र देशाभरातून या आरोपींच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींची नावे एफआयआरमध्ये नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या एफआयआरमध्ये फक्त बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याचा यूएपीए उल्लेख होता. पोलिसांनी या पाच जणांना ११ कलमे लावून अटक केली होती, पण एफआयआरच्या प्रतीत फक्त २ कलमांचाच उल्लेख आहे. आता पुणे पोलिसांनी असा दावा केला आहे की, गोळा केलेल्या पुराव्यांवरून असे दिसते की कबीर कला मंच आणि अटक केलेल्या कार्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांच्या मदतीने निधी गोळा केला, गर्दी जमवली आणि सामाजिक भावना भडकावणारा कार्यक्रम केला. नक्षलवाद्यांनी या जमवलेल्या लोकांच्या मदतीने मागास समुदायाच्या लोकांना चिथावले आणि त्यामुळेच कोरेगाव भीमात हिंसाचार झाला.