Banner News

पुणे, पिंपरी चिंचवड सोमवार पासून लॉकडाऊन – अजित पवार

By PCB Author

July 10, 2020

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी सोमवारी (१३ जुलै) मध्यरात्री पासून १५ दिवसांसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. पुणे शहरात हजाराच्या प्रमाणात तर पिंपरी चिंचवड मध्ये रोज ६०० च्या दरम्यान कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे. बाजारपेठ खुली केल्या पासून हे प्रमाण दुप्पट-तिप्पट दराने वाढत असल्याने प्रशासन हतबल आहे. दुसरीकडे कोरोना बाधित गंभीर रुग्णांवर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नाहीत. खासगी हॉस्पिटलमध्ये दोन-चार दिवसांची वेटिंगह लिस्ट आहे. वारंवारा सुचना करूनही लोक विनाकारण घराबाहेर पडतात. दुचाकी व चार चाकी वाहनांवर एक-दोघांनाच परवनागी असताना सर्रास तीन-चार लोक बसून फिरतात. मंडईतसुध्दा गर्दी असते. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊन केला तरच कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकतो, असे सार्वत्रिक मत पडले.

या संबंधी अधिक माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंगटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त शेखर गाकवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुणे– पिंपरी शहरातील लोकप्रतिधींपैकी आमदार, नगरसेवकांची कोरोना संख्या वाढत गेली. अधिकारी, पोलिसांना सुध्दा बाधा झाली.  त्यानंतर महापौरांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही लॉकडाऊनची गरज व्यक्त केली. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला. बाजारपेठेतील किराणा, भाजीसुध्दा बंद  राहणार आहे. दूध आणि मेडिकल फकित सुरू राहिल.

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालला आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यात बुधवारी 1618 कोरोना रुग्ण वाढले होते तर गुरुवारी ही संख्या वाढून 1803 वर पोहोचली. यामध्ये पुणे शहर 1032, पिंपरी चिंचवड 573, पुणे ग्रामीण 137 अशी रुग्णांची संख्या आहे.

पिंपरी चिंचवडमध्येही वेगाने वाढ पुणे सरासरी वाढ तेवढीच राहिल्याचं दिसत आहे, मात्र पिंपरी चिंचवड रुग्णांची संख्या तीनशेवरून पाचशेवर गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सरासरी वाढ पन्नासवरून दीडशेच्या जवळपास पोहोचली आहे, म्हणूनच शहरालगतची 20 गावं पुन्हा सीलबंद केली आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या 34399 तर पुणे शहरातील 25 हजारांवर गेली आहे.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने शहरालगत हिंजवडी आणि मारुंजी परिसरात कालपासूनच 8 दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत.9 जुलै ते 16 जुलै दरम्यान केवळ दूध,मेडिकल आणि दवाखाने सुरू असतील. तसंच या भागातील आयटी कंपन्यांना मात्र सूट देण्यात आली आहे.

दुसरीकडे, हवेली तालुक्यातील नांदेड गाव, खडकवासला, किरकीटवाडी ,नऱ्हे,मांजरी, पिसोळी, वाघोली, न्यू कोपरे,खानापूर,गुजर निंबाळकरवाडी,वडाची वाडी, लोणी काळभोर,भिलारे वाडी ,उरुळी कांचन, शेवाळेवाडी, भिलारे वाडी कदमाक वस्ती,कुंजीर वाडी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता.