पुणे, पिंपरी चिंचवड शहरात कहर

0
626

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. पिंपरी चिंचवड शहरात आता रोज १०-१२ रुग्णांची भर पडते आहे, तर पुणे शहरात २०० च्या रेशोमध्ये रुग्ण वाढत असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पिंपरीत गुरुवारी १३ रुग्ण आढळले. वाल्हेकरवाडी, इंद्रायनीनगर या परिसरात आजवर एकही रुग्ण नव्हता आता बाधित रुग्ण आढळले. पिंपरी चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या २५५ वर पोहोचली आहे. शहरातील निगडी, प्रधिकरण, आकुर्डी परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या भागात सर्वाधिक ४८ रुग्ण आढळले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत १५४ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये शहरातील १४२ तर शहराबाहेरील १२ रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील ७ कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला, तर शहराबाहेरील ९ कोरोना रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ९३ आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका २१ मे पर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारी : प्रभाग अ निगडी, प्रधिकरण, आकुर्डी- ४८. प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत- ६. प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरुनगर, अजमेरा कॉलनी -२. प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे – ४. प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली – १८. प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली – ७. प्रभाग ग – पिंपरी थेरगाव रहाटणी – ५. प्रभाग ह – दापोडी कासरवाडी सांगवी – ३

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात आज २०८ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार १०७ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात एकूण ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत २२७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आज दिवसभरात १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात आतापर्यंत २,१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १,६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.