Pimpri

पुणे, पिंपरीतील सहा बड्या बिल्डर्सवर छापे, राजकीय गोटातसुध्दा उडाली मोठी खळबळ

By PCB Author

May 04, 2023

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील काही मोठ्या बिल्डर्सवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. सकाळपासून कारवाई सुरु झाली आहे. या कारवाईत बांधकाम व्यावसायिकांना रडारवर होते. पुणे येथील अधिकाऱ्यांचे पथक ही कारवाई करत आहे. यामध्ये किती बेहिशोबी रक्कम उघड होणार? याकडे लक्ष लागले आहे. पुणे परिसरातील पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी पोहचले आहेत आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंधीत बिल्डरवर छापा पडल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यात कुठे सुरु आहेत छापे – पुण्यातील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. हे तिन्ही बांधकाम व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी पहाटेपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे.

नाशिकमध्ये राज्यातील सर्वात मोठी कारवाई नुकतीच झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता उघड झाली आहे. राज्यातील बडे अधिकारी, व्यापारी आणि राजकीय नेते यांची यामध्ये गुंतवणूक आहे. जवळपास दीड हजार अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी केली संबंधित बिल्डरांकडे गुंतवणूक केली आहे. आयकर विभागाच्या छाप्यात बिल्डर्सचे 3333 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड झाले आहे. या कारवाईचे धागेदोरे पुणे शहरातही होते. त्यामुळे आता सुरु असलेली कारवाई आणि नाशिकमधील कारवाई याचा संबंध आहे का? यासंदर्भात चर्चा सुरु आहे.

नाशिकमध्ये तब्बल सहा दिवस कारवाई सुरु होती. बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, निवासस्थाने आणि इतर ठिकाणी झाडाझडती करण्यात येत होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा दिवसांत तब्बल 3333 कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघड केल्यानंतर आता दुसरा टप्पा सुरु होणार आहे. यामध्ये ज्या लोकांना बांधकाम व्यावसायिकांकडे गुंतवणूक केली, ते रडारवर असल्याची सांगितले जात आहे. नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर, घरावर छापा टाकल्याने खळबळ उडाली होती. कर चुकवेगिरी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे यामुळे चांगलेच दणाणले होते. त्यात तब्बल सहा दिवस चौकशी झाल्याने चौकशी नेमकं काय आढळून आलं ? यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.