पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख भाजपा उमेदवार

0
338

पुणे, दि. 9 (पीसीबी): पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, औरंगाबाद पदवीधर मतदार संघातू शिरीष बोरालकर, नागपूर विभागातून संदिप जोशी आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून नितीन धांडे यांची नांवे जाहिर झाली आहेत. 

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपकडून यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग चालू होण्यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया भाजपच्यावतीने मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे त्याला ब्रेक बसला होता. मात्र, आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची तयारी पक्षाच्यावतीने सुरु झाली आहे. गुरुवार (ता. 12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदवीधर मतदार आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठविणार आहेत. यापूर्वी दोनवेळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून विजय मिळविल्यामुळे त्यांचा वारसदार ठरविताना पक्षाची कसोटी लागणार आहे. 

सांगली भाजपचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु होती. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे ते बंधू आहेत. त्यांचा सातारा जिल्ह्यात साखर कारखाना आहे. त्यामुळे पदवीधरची उमेदवारी आपल्यालाच मिळेल यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले होते. पुणे भाजपचे शहर सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. संघ परिवारातील उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मावळातील रवींद्र भेगडे यांनी सर्वाधिक नोंदणी करून आपलीही जोरदार तयारी केली होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाची चर्चा गेल्या दोन दिवसांत सुरू झाली होती.