“पुणे- नाशिक महामार्गावरील साईड पट्ट्यांची दुरूस्ती करा” : नगरसेवक वसंत बोराटे

0
196

– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – मोशीमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाच्या साईड पट्ट्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यालगत वारंवार विविध कामांसाठी खोदकाम करण्यात आल्याने साईड पट्ट्या खचल्या आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे, अशी मागणी भाजपा नगरसेवक वसंत बोराटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मोशी नागेश्वर महाराज उपबाजार समिती आवार येथील हिरामण बोराटे चौक ते टोल नाका या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईड मोशीत नाशिक महामार्गालगतच्या साईड पट्ट्या खचल्या असून, वाहने घसरण्याची शक्यता आहे. पट्ट्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी ऐन पावसाळ्यात महामार्गाच्या दोन्ही बाजूला केबल टाकण्यात आली. त्यावेळी खोदाई केल्यावर मुरूम टाकून साईड पट्ट्या पूर्ववत करणे अपेक्षित होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पाऊस सुरू होताच दोन्ही बाजूला चिखल झाला असून पायी चालणाऱ्यांना रस्त्याच्या कडेने चालणे शक्य होत नसल्याने नाईलाजाने ते रस्त्यावरूनच चालतात. दुचाकी घसरून पडत आहेत, महामार्गावर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. अशावेळी पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या भागातील स्थानिकांनी महामार्गासाठी आपल्या जमीनी दिल्या आहेत. त्यांनाही रस्ता ओलांडून जाण्यासाठी कडेला थांबायला चिखलामुळे जागाच नाही. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी आमची मागणी आहे.

महामार्गावर टोल वसुली करणारी कंपनी साईड पट्ट्या खचल्या असताना दुर्लक्ष करत आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. टोल वसूल करणाऱ्या कंपनीने महामार्गाच्या या साईड पट्ट्यांचे तातडीने मजबुतीकरण करून संभाव्य अपघात टाळावेत व पादचाऱ्यांची गैरसोय दूर करावी, अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेवून आम्हाला प्रशासनाविरोधात आंदोलन उभा करावे लागेल, असेही नगरसेवक बोराटे यांनी म्हटले आहे.