पुणे जिल्ह्यातील ‘या’ उमेदवाराला मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्रिपदाचे आश्वासन

0
635

पुणे, दि. १८ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यास सुरूवात केली आहे. तुम्ही राहुल कुल यांना आमदार करून पाठवा.  मी त्यांना मंत्री करून पाठवतो, असे सांगून  दौंडचे विद्यमान आमदार कुल यांच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब  केला.

दौंड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची चौफुला येथे जाहीर सभा झाली.  त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातला तिसरा मंत्र्याचे नांव  जाहीर करून टाकले. यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर करून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, राहुल कुल  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी राहुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. त्यामुळेच राहुल यांना मंत्रिपद देण्याचे फडणवीसांनी आश्वासन  दिल्याचे दौंडमध्ये  बोलले जाऊ लागले आहे.

याआधी कर्जत-जामखेडचे भाजप उमेदवार आणि मंत्री राम शिंदे  आणि  माण-खटावचे भाजप उमेदवार जयकुमार गोरे यांनाही मंत्रिपद देऊ, असे फडणवीसांनी म्हटले होते. यामुळे आता कोणाकोणाला मुख्यमंत्री मंत्रिपदाचे आश्वासन देणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.